पुण्यातल्या पदपथांचा श्वास कोंडला! अतिक्रमणापुढे सगळेच हतबल; कारवाईचे फिक्स पॉइंट तयार करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
पुणे: सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने बैठका घेतल्या जात असल्या तरी शहरात पदपथांवर अतिक्रमणे वाढली अाहे. पादचाऱ्यांना चालायलाही जागा मिळत नाही, यासंदर्भात जुलै महीन्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी बैठक घेऊन रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यास सांगितले हाेते. परंतु परीस्थिती जैसे थे असल्याचे सत्ताधाऱ्यांना मान्य करावे लागले अाहे. पुणे शहरातील विकास कामे व समस्यांच्या संदर्भात शनिवारी (दि. ४) मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळ, हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते.
कारवाईचे फिक्स पॉइंट तयार करा
मोहोळ म्हणाले, ‘‘जुलै ते जानेवारी या कालावधीत कामाची प्रगती आहे, पण ती जास्त नाही. त्यामुळे प्रशासनाला वेगाने प्रकल्पांचे काम करावे अशी सूचना आज स्पष्टपणे दिली आहे. प्रशासनाच्या मागणीप्रमाणे केंद्र व राज्य शासनाकडून पैसे मिळत आहेत. आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही अतिक्रमण कारवाईचा शो करणार, दोन तीन दिवस कारवाई करणार आणि थांबणार हे नको आहे. बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कारवाई करून त्याचा अहवाल आम्हाला सादर करावा, पोलिसांच्या मदतीने कारवाईचे फिक्स प्वाईंट तयार करा, शहरातील अतिक्रमणाचा विषय आता संपला पाहिजे, यावर आम्हाला कायमचा तोडगा हवा आहे. अतिक्रमण करवाई करताना कोणाचेही ऐकायचे नाही, आमच्यातील कोणीही अडवायला येणार नाही, आले तर ऐकायचे नाही. जर अतिक्रमण काढले नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’’
पालिका, मेट्रो, पोलिसांची एकत्रित बैठक घेणार
वाहतूक आणि अतिक्रमण हे पुणेकरांसाठी संवेदनशिल विषय आहेत, त्यावर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यसभेने वाहतुकीचा वाहतूक आराखडा तयार केला आहे, त्याची अंमलबजावणी केली जात नाही त्याबाबत विचारणा केली, त्यावर प्रशासनाने या आराखड्यात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नागरिकांच्या सूचना घेऊन अंतिम केला जाईल, असे सांगितले. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, मेट्रो, आणि वाहतूक पोलिसांची एकत्रित बैठक घेणार आहोत, असे मोहोळ यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्तांची मागणी करणार
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहा महिन्यामध्ये दोन निवडणुकांची आचारसंहिता लागली, त्यात निवडणूक आयोगाकडून सक्तीने बदल्या केल्या जातात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता नियमीत बदल्या होत आहेत. २०-२२ अधिकाऱ्यांच्या बढत्या झाल्या आहेत. २०० अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. मुंबईनंतर सर्वाधिक मोठ्या रकमेचे प्रकल्प पुण्यात सुरु आहेत, त्यामुळे त्यावर नियंत्रण असण्यासाठी त्या दर्जाचे अधिकारी असणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास प्रकल्प रेंगाळून त्याचा खर्च वाढतो.
‘‘महापालिका प्रशासनाच्या मागण्या आहेत. भूसंपादनासाठी पैसे द्यावेत यासह अन्य काही मागण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मी व मुरलीधर मोहोळ मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊ. आचारसंहितेच्या काळात आम्हाला पाठपुरावा करता येत नाही, त्यामुळे काही गोष्टीत कमी पडलो, पण आता दर महिन्याला बैठक घेऊन त्यात गेल्या महिन्याभरात काय केले याचा आढावा घेणार आहोत.’’
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
‘महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत समान पाणी पुरवठा योजना, मुळामुठा नदी शुद्धकरणे, नदी काठ सुधार प्रकल्प, तसेच इतर पूल, उड्डाणपूल यांच्या कामाचा आढावा घेतला. नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी शासनाकडून यापुर्वी टप्प्याने निधी मिळाला अाहे. लवकरच १०० कोटी रुपये मिळतील. तसेच अर्बन प्लड याेजनेचे ७५ काेटी रुपये राज्य सरकारकडे जमा झाले अाहे. ते लवकर महापािलकेला मिळतील.’’
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री