"मी वडगावशेरीच्या आमदाराविरुद्ध जंग जंग पछाडून..."; खासदार सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना इशारा
पुणे: वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडानं मतं मागणार? असा सवाल करत त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. वडगावशेरी मतदारसंघातील लोहगाव येथे सुनील खांदवे-मास्तर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर यांनी जोरदार टीका केली.
कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडानं मतं मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे. हे लोकं गुन्हेगार आहेत आणि म्हणतात मी काही केलं नाही. पोलीस स्टेशन, ससून रुग्णालयात कोणी फोन केले? हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, मृतांची आई हक्क मागते. पोर्श कार अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर, एक आई म्हणून सरकारला जाब विचारते.
“पोर्शे कार अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी रक्त बदलण्याचं पाप केलं. तसेच आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला दिली. पोर्शे कारने खून केलेल्या निष्पाप दोन जणांच्या आई-वडिलांचे अश्रू पुसायला तुम्ही जाणार आहात का?” असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार टिंगरे यांना विचारला.
अशा अपप्रवृत्तींना घरी बसवा
“मृतांच्या आईला न्याय देण्यासाठी तर मी वडगावशेरीच्या आमदाराविरुद्ध जंग जंग पछाडून न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा लोकांना घरी बसविण्याची जबाबदारी वडगावशेरीमधील नागरिकांची आहे,” असं म्हणत सुळे यांनी टिंगरे यांना इशारा दिला.
पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी रंगणार सामना?
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जाेरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काॅंग्रेस (एसपी) या पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. या पक्षाकडून काेणाला उमेदवारी दिली जाणार यावर बरेच चित्र अवलंबुन आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. पर्वतीमधून अश्विनी जाधव, खडकवासल्यातून सचिन दाेडके हे जाेरदार प्रयत्न करीत आहेत. हडपसर,वडगांव शेरी या दाेन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र पाहण्यास मिळेल. हे दाेन मतदारसंघ काेण राखणार यावरच दाेन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे.