
पुरुषोत्तम जगताप यांच्यावर राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई
राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्ष सचिन सातव, बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र कोरेकर व संदीप बांदल म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी पुरुषोत्तम जगताप यांना सलग तेरा वर्ष अध्यक्षपदाची संधी दिली. तरीदेखील त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधी भूमिका घेऊन स्वतंत्र पॅनल उभा केला. जगताप यांच्यासह काही संचालकांनी पक्षाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सभासदांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतले आहे. या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यासह काही संचालकांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत संभाजी होळकर म्हणाले, अजितदादांचा यायच्या एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या समर्थकांनी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता, त्यांनी घेतलेली भूमिका कोणालाही पटलेली नाही, सभासदांमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अजितदादांनी 34 वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला मोठी मदत केली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अनेक प्रश्न सुटून सोमेश्वर कारखान्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे सोमेश्वरचा सर्वांगीण विकास
अजितदादा नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर कारखान्याचे प्रश्न सोडवले आहेत. कोणीही एकटा चेअरमन कारखान्याचा विकास करू शकला नसता, मात्र अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे व कुशल नेतृत्वामुळे सोमेश्वरचा सर्वांगीण विकास झाला आहे. सोमेश्वर कारखान्याचे सभासद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे येणाऱ्या निकालाच्या माध्यमातून विरोधकांना मोठी चपराक बसणार असल्याचे होळकर यांनी सांगितले.नगराध्यक्ष सचिन सातव यांनी जगताप यांच्याबरोबर जे आजी-माजी पदाधिकारी असतील, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई पक्षश्रेष्ठी करत असल्याचे सांगितले.