
Everyone is eagerly awaiting the results of the Nagar Panchayat elections in Vadgaon Maval
Maharashtra Political News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीस आता अवघे दोन दिवस उरले असून नगराध्यक्षपदासह नगरसेवक उमेदवार आणि नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानानंतर आत्मपरीक्षणासाठी भरपूर कालावधी मिळाल्याने विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी ढोल–ताशे, बेंजो, फटाके आणि गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.
नगरपंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. सुरुवातीला मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती; मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना तब्बल १९ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागली. थंडीचा कडाका वाढला असतानाच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. थंडीतही पोलिस पहाऱ्याची चोख व्यवस्था कायम आहे. निकालाची तारीख जवळ आल्याने उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
हे देखील वाचा : “मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं
वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अँड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्यात थेट लढत झाली आहे. बहुजन विकास आघाडीकडून वैशाली उदागे, तर अपक्ष म्हणून नाझीमुल्ला शेख रिंगणात आहेत. वैयक्तिक करिष्म्यामुळे कोण किती मते खेचतो, यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून असणार आहे.
मावळात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने सत्ताधाऱ्यांकडून नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी घेण्यास कोणी तयार नसल्याची चर्चा होती. मात्र भाजपने ऐनवेळी डाव साधत माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या कन्या अँड. मृणाल म्हाळसकर यांना मैदानात उतरवले. त्यामुळे प्रचारादरम्यान विरोधकांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र दिसून आले. अत्यंत कमी कालावधीत भाजपने जोरदार प्रचार करत वातावरण तापवले.
हे देखील वाचा : सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
प्रचारकाळात नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता भाजपकडूनही विजयाची जोरदार तयारी सुरू आहे. नगरसेवकपदासाठीही सर्व प्रभागांत चुरशीची लढत झाल्याने सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. कडाक्याच्या थंडीतही राजकीय चर्चांना ऊत आला आहे. रात्रीच्या वेळी चौकाचौकांत शेकोट्या पेटलेल्या दिसत असून, त्या शेकोटीभोवती नगरपंचायतीच्या निकालावर रंगतदार चर्चा सुरू आहेत. कार्यकर्ते आणि नागरिक आपापले अंदाज मांडण्यात मग्न असून, काही ठिकाणी तर पैजाही लागल्याचे दिसत आहे. अशा थंड वातावरणात राजकीय चर्चांमुळे वडगाव मावळचे वातावरण मात्र चांगलेच तापले आहे