विमानतळावर पिकअप-ड्रॉपसाठी १५ मिनिटांची मर्यादा
१ डिसेंबरपासून नियमाची कठोर अंमलबजावणी
वेळ ओलांडल्यास ५०० रुपये दंड
Pune Airport: पुणे विमानतळावरील वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिकअप-ड्रॉप मार्गिकेत वाहनांना थांबण्यासाठी १५ मिनिटांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या वेळेपेक्षा अधिक काळ (murlidhar mohol) वाहन थांबविल्यास संबंधित वाहनचालकाला ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.
येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर या नियमाची अंमलबजावणी केली जाणार असून, १ डिसेंबरपासून त्याची कठोर अंमलबजावणी होणार आहे.विमानतळाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गिकांवर वाहनांची वाढती गर्दी ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक वाहनचालक प्रवाशांची वाट पाहण्यासाठी पिकअप-ड्रॉप क्षेत्रात बराच वेळ थांबत असल्याने इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने १५ मिनिटांची वेळमर्यादा निश्चित केली आहे.
Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका
नव्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी विमानतळावर स्वयंचलित क्रमांक ओळख प्रणाली (एएनपीआर) बसविण्यात आली आहे. पिकअप-ड्रॉप मार्गिकेच्या प्रवेश आणि निर्गमन ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे क्रमांक आणि छायाचित्रे नोंदविली जातील. संबंधित वाहनाने मार्गिकेत किती वेळ घालविला, याची संगणकीय पद्धतीने गणना केली जाणार आहे.
१५ मिनिटांची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. हा दंड फास्टॅग किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून भरता येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, "प्रवाशांची सोय आणि विमानतळावर विनाअडथळा प्रवेश हे आमचे प्राधान्य आहे. तंत्रज्ञानावर आधारित १५ मिनिटांच्या वेळमर्यादेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होऊन वाहतूक शिस्त सुधारेल आणि प्रवाशांना सुरक्षित व सुखकर अनुभव मिळेल."
Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
प्रवाशांची वाट पाहण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्यास वाहनचालकांना मल्टिलेव्हल कार पार्किंग किंवा 'एरो मॉल'मधील पार्किंगचा वापर करावा लागणार आहे. या पार्किंगच्या ठिकाणाहून विमानतळाच्या मुख्य टर्मिनलपर्यंत जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे विमानतळावरील पिकअप-ड्रॉप मार्गिकेत वाहन किती वेळ थांबवता येणार आहे?
पुणे विमानतळावरील पिकअप-ड्रॉप मार्गिकेत वाहनांना जास्तीत जास्त १५ मिनिटे थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबवल्यास किती दंड आकारला जाणार आहे?
पिकअप-ड्रॉप मार्गिकेत १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ वाहन थांबवल्यास संबंधित वाहनचालकाला ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.