

एफडीएचा ९६ आस्थापनांना दणका, लायसन्स रद्द
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पाच आस्थापनांना बंदच्या नोटिसा
हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरीसह ऑनलाइन खाद्य वितरण केंद्रांची तपासणी
सुनयना सोनवणे /FDA: नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अन्न सुरक्षा विषयक तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विशेष तपासणी मोहीम राबविली. 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' अभियानांतर्गत २० आणि २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मोहिमेत ९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आले, तर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पाच आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शिवाजीनगर कार्यक्षेत्रात ४६ आस्थापनांची तपासणी करून पाच परवाने आणि तीन नोंदणी निलंबित करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड आणि तळवडे परिसरातील ५० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तेथे चार आस्थापनांवर परवाने अथवा नोंदणी निलंबनाची कारवाई झाली.
FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र साठवणूक नसणे, अन्नपदार्थ उघडे ठेवणे, कीटक नियंत्रण व खाद्यतेल तपासणीच्या नोंदी नसणे अशा त्रुटी आढळल्या. एका ठिकाणी समोशाची पट्टी कर्मचाऱ्याच्या पँटवर ठेवून अन्न तयार केले जात असल्याचेही निदर्शनास आले.
काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. व्यावसायिकांनी नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन सहआयुक्त करकळे यांनी केले.
विनापरवाना उत्पादनांची विक्री आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोंढवा खुर्द येथील सौंदर्यप्रसाधन विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७ लाख ३० हजार २६२ रुपये किमतीचा विविध सौंदर्यप्रसाधनांचा साठा सोमवारी (ता.२३) जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील औषध निरीक्षक श्रुतिका जाधव (राठोड) यांनी मायरा कॉस्मेटिक्स या दुकानाची तपासणी केली.
Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित