पुणे: आजपासून आषाढी वारीची सुरुवात झाली आहे. श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूर नगरीकडे प्रस्थान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. दरम्यान पुण्यनगरीत माउलींच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मानवंदना दिली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला मानवंदना दिली. या प्रसंगी “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला.
कर्नाटकातील बेळगाव येथील अंकली गावातून शितोळे सरकार यांच्या मालकीचे दोन अश्व दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करणारे हे अश्व आता दरवर्षी वारीपूर्वी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊनच आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होतात. यंदाही त्यांनी सभामंडपात येत गणरायाचे दर्शन घेतले.
या विशेष प्रसंगी अश्वांचे पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, तसेच शितोळे सरकार परिवारातील श्रीमंत उर्जितसिंह, महादजी राजे, युवराज विहानराजे आणि मोहिनीराजे शितोळे या वेळी उपस्थित होते.
सुनील रासने म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा सुरु असून वारीतील अश्वांचा गणरायाला दिला जाणारा नमस्कार हे एक भक्तिभावाचे दर्शन आहे. महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, ट्रस्टतर्फे वारीदरम्यान हरित वारी, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, रुग्णवाहिका व भोजन सेवा यांसारखे विविध उपक्रम राबवले जातात, आणि त्याची सुरुवात याच मंगलप्रसंगाने होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुमित्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.