संग्रहित फोटो
गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी धार्मिक विधी आणि कार्यक्रम शांततेत तसेच शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील किंवा शांतता भंग होईल, असे कार्यक्रम आयोजित करू नयेत. तसेच पोस्टर, सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना पोलिस निरीक्षक पवार यांनी दिल्या.
डीजे वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. तसेच डीजेचा वापर करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांसह संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी तसेच डीजे चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नियमबाह्य ध्वनिवर्धकांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारंपरिक वाद्यांना प्राधान्य
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, बँजो किंवा नियमानुसार परवानगी असलेल्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करावा. मिरवणुकीदरम्यान ध्वनीची मर्यादा, वेळ आणि इतर प्रशासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
विसर्जनावेळी सुरक्षेची काळजी घ्या
गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पोहता येत नसलेल्या व्यक्तींनी पाण्यात उतरू नये, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकडे मंडळांनी व कुटुंबीयांनी विशेष लक्ष द्यावे.विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, विद्युत रोषणाई, सजावट आणि इतर साहित्यामुळे कोणताही अपघात होणार नाही, याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. विसर्जन घाटावरही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून उत्सव साजरा करावा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.






