संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी साडेनऊ वर्षांच्या मुलीला पेरू देण्याचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेण्यात आले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी पीडितेच्या २५ वर्षीय ओळखीच्या गावातील आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात खून, बलात्कार, बारा वर्षांखालील मुलीवरील बलात्कार आणि अपहरणासंबंधी भारतीय न्याय संहितेतील कलमांसह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष तपास पथकाचा वेगवान तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी तपासावर देखरेख केली, तर आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपासी अधिकारी म्हणून पुरावे संकलित केले. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच अन्य तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांचा दोषारोपपत्रात समावेश करण्यात आले.
नवीन साक्षीदार आले पुढे
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, तपासादरम्यान काही नवीन साक्षीदार पुढे आले असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपी विरोधात वागणुकीबाबत गावपातळीवर यापूर्वी अनेक तक्रारी अथवा नाराजी असल्याची माहिती समोर आली; मात्र त्याबाबत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आली आहे.
घटनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले, तरी खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती झालेली नाही. गंभीर गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






