
पुण्यात गणेशोत्सवातील 'तो' मुद्दा पेटणार? विद्यानंद बापटांची थेट पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि महापालिकेला नोटीस
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी, वायू व घनकचरा प्रदूषणासह मंडपांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट यांच्या वतीने प्रशासनातील संबंधित यंत्रणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे व त्यांच्या टीमने ही नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.
गणेशोत्सवात नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये आणि सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी डीजे व अॅम्प्लीफायरच्या वापरावर निर्बंध घालण्याबरोबरच लेझर शो वरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालये व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी. रुग्णालये, शाळा व न्यायालयांभोवतालच्या शांतता क्षेत्रांचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असेही नोटिशीत म्हटले आहे.
तीन दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा
मंडपांमुळे रस्ते, पादचारी मार्ग तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा होणार नाही, याची खात्री करावी. अडथळा ठरणाऱ्या मंडपांवर कारवाई करून गरज असल्यास त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी आहे. फटाके, प्लास्टिक कचरा व सीओ कॉन्फेटी कॅननवर निर्बंध तसेच ध्वनीची पातळी नागरिकांना दिसण्यासाठी रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तीन दिवसांत उत्तर न दिल्यास गणेशोत्सवानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
Dholya Ganpati History : वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती ! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास