Vijay Shivtare: "मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल ही खात्री होती मात्र..."; विजय शिवतारे नाराज? जाणून घ्या
सासवड: नुकताच महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला संधी मिळेल अशी खात्री होती. अगदी मंत्रिमंडळाच्या विस्तार जवळ येईपर्यंत पहिल्या पाच मध्ये माझे नाव होते. परंतु ऐनवेळी माझे नाव कट झाले. त्यामुळे मी नक्कीच नाराज झालो होतो. वास्तविक पाहता मला संधी मिळणार नाही याची अगोदरच माहिती दिली असती तर त्या द्र्ष्टीने मी तयारी केली नसती. परंतु शेवटी पक्ष नेतृत्वाचा आणि महायुतीचा निर्णय आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नसले तरी नाराजी न धरता तालुक्याच्या विकासकामांना जास्तीतजास्त वेळ देणार आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली आहे, ते प्रकल्प आगामी तीन वर्षात पूर्ण करण्यावर भर देणार आहे. अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना मंत्रिपद देणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यादृष्टीने विधानसभेच्या निकालानंतर आमदार शिवतारे मुंबईमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते. मंत्रिमंडळ विस्तारत कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी खात्री होती. अगदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवसापर्यंत पहिल्या पाच मध्ये शिवतारे यांचे नाव होते. तसेच नागपूर मध्ये मंत्र्यांचा शपथविधी असल्याने पुरंदर मधून अनेक शिवसैनिक शपथविधीसाठी नागपूरला गेले होते. मात्र ऐनवेळी शिवतारे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार तोफ डागली होती. तसेच अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळाले तरी स्वीकारणार नाही अशीही भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी अधिवेशन सोडून थेट मतदार संघ गाठला.
मतदार संघात आल्यावर पुरंदर शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर बैठक घेवून कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, महिला आघाडीच्या ममता लांडे – शिवतारे, युवा सेनेचे नितीन कुंजीर, माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी, सचिन जाधव, धीरज जगताप, माणिक निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, गुंजवणी प्रकल्पाची पाईप लाईन हे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे.त्याचप्रमाणे नीरा नदीतील पाणी जेजुरीच्या नाझरे धरणात सोडून पूर्व भागाला पिण्यासाठी देण्यात येईल. त्याचबरोबर जनाई सिरसाई योजनेच्या समाविष्ट पुरंदर, बारामती मधील गावांना देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. पुरंदर उपसा योजनेचे पंप दुरुस्त करून तालुक्या तील गावांना तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हवेली मधील गावे नगरपालिकेत समाविष्ट केली असून स्वतंत्र नगरपालिका असल्याने पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच इतर महत्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.