रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न
महाड,प्रतिनिधी: इतिहासात नोंद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दोन वेळा राज्याभिषेक करवून घेतला. पहिला राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी, तर द्वितीय राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी पार पडला. महाराजांच्या प्रथम राज्याभिषेकाची आठवण जगभरात उत्साहात साजरी होत असताना, द्वितीय राज्याभिषेक मात्र विस्मृतीत गेला आहे, अशी अनेक शिवप्रेमींची भावना आहे. याच अनुषंगाने गेल्या १० वर्षांपासून संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर हा सोहळा साजरा केला जात आहे. यावर्षीही, प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय (शाक्त) शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य जनता हवालदिल झाली आहे. शिवरायांना अपेक्षित असलेल्या “रयतेचे राज्य” या भावनेने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरातत्व आणि प्रशासनाच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन हा सोहळा पार पडला. या वेळी रायगडावरील संपूर्ण वातावरण नयनरम्य झाले होते.
Satara : “मी मुस्लिम, पण शिवरायांचा मावळा”; सादिक शेख यांनी काय केलं, पाहा व्हिडीओ
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी रायगडावर उपस्थिती लावली होती. संपूर्ण परिसर शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले, रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांचा मुलगा वेध वैभव सुर्वे. त्याने साकारलेली बाल शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंतदेसाई, कोकण अध्यक्ष सुभाष सावंत, कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर, सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.