रायगड: राज्यात पाणीटंचाईमुळे ठिकठिकाणी गावखेड्यातील नागरिकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होतंय तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी करत असलेल्या संघर्षाने होरपळून निघत आहेत. पेण तालुका तरण खोप गावापासून 4ते 5 किलोमीटर अंतरावर असलेला हा माळवाडी गाव. या ठिकाणी 40 ते 25 घरांची वाडी आहे . या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रोज रात्री 3 ते 4 वाजता नागरिक पाणी भरतात. भर अंधारात काट्याकुट्यातून वावर असलेल्या डोंगराच्या रस्त्यातून पाणी भरण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे.
डोंगराच्या झऱ्याचं पाणी थेंबे थेंबे साचत असल्याने या ठिकाणी ग्लासातून पाणी भरावं लागतं. पाण्यासाठी लवकर उठून पळत जाणं, एका एका हांड्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत असल्याने गावकरी मेटाकुटीला आले आहेत. घोटभर पाण्यासाठी रांग लावावी ते ही पाण्याचा दुषित पुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे वाडीतील मुलं आजारी पडत आहेत. डोंगराच्या पाण्याचा झरा असल्याने या ठिकाणी जंगलातली जनावरे गुरेढोरे हाच पाणी पिण्याकरिता इथे येतात.य त्यामुळे या जंगली श्वापदांची देखील मोठी भिती असते अशी व्यथा गावकऱ्यांनी मांडली आहे.
जंगलातल्या जनावरांना जे पाणी आहे तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं. आम्ही माणसं आहोत की गुरं असा संतप्त सवाल करत गावकऱ्यांनी सत्ताधारी सरकारावर ताशेरे ओढले आहेत. सरकार योजना गावात येतात परंतु त्या योजनांचा उपयोग आम्हा गरिबांना होत नाही. गावात बोरिंग आहे पण पाणी नाही. गावात टाकी आहे पाईप आहे पण पाणी नाही. मग आम्ही माणस आहोत ढोर आहेत अशी म्हणायची वेळ आता आम्हाला आलेली आहे. त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे नको पण रस्ता आणि पाणी द्या. हेटवणे धरण ,भोगावती नदी आमच्या उशाशी कोरड मात्र माळवाडीच्या नागरिकांच्या घशाला कोरड आहे. सरकारने पाण्याच्या या समस्येची दखल घ्यावी असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.