
Raigad News: महाडमधील शिवसेना-राष्ट्रवादी राडाप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी: सोमनाथ ओझर्डे यांची मागणी
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) शंकर काळे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आगामी निवडणूक काळात त्यांची बदली अथवा सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणीही त्यांनी मांडली. यापुढे बोलताना ओझर्डे म्हणाले की, “महाडच्या इतिहासात अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच घडलेली नाही. जवळपास १५ दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेबाबत मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे सांगत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला. विकास गोगावलेंच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल तपास करून त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
यावेळी ओझर्डे यांनी महाड एमआयडीसीतील काही खासगी कंपन्यांचा उल्लेख करत आणखी गंभीर बाब समोर आणली. या कंपन्यांमध्ये विकास गोगावले यांचे काही साथीदार कामाला असून ते देखील या गुन्ह्यातील आरोपी असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र गुन्ह्यात नाव असूनही आणि कामावर गैरहजर राहूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. इतर सर्वसाधारण कामगार कामावर गैरहजर राहिल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई होते; मात्र या आरोपी कामगारांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नसल्याने प्रशासन व संबंधित कंपन्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचे त्यानी नमूद केले.
डी. वाय.एस.पी. शंकर काळेच्या कामकाजावर आरोप करताना, ते सरकारऐवजी मंत्री गोगावलेंची चाकरी करत असल्याची टीका ओझर्डेनी केली. आरोपी बिनधास्तपणे फिरत असून नागपूर येथे अधिवेशनात विकास गोगावले उपस्थित असल्याची माहितीही त्यांनी दिली. फोनवरून कार्यकत्यांच्या संपर्कात असल्याचेही काही कार्यक्रमातून उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
पोलीस प्रशासन अशा प्रकारे कानाडोळा करत असेल, तर पोलिसांनी तपास कसा करावा हे देखील आम्हालाच सांगावे लागेल का? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोणालाही अभय न देता आरोपीना अटक करावी. जर आरोपींना अटक झाली नाही, तर येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाड नगरपरिषद मतमोजणीदरम्यानही दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. – सोमनाथ ओझर्डे, सरपंच, शिरगाव
विकास गोगावले यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल तपास करून त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा विचार करावा आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच पोलिस संरक्षण असतानाही विकास गोगावले फरार कसे? असा सवाल उपस्थित करीत पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात संबंधित पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.