कर्जत/ संतोष पेरणे: दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळली भर झोपेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. या सगळ्याची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे होताना दिसत आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलना दरम्यान पळसदरीमधल्या ठाकूरवाडी येथील 80 घरांचे स्थलांतरण करण्यात आले होते. या घटनेला दोन वर्ष उलटूनही अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही. ठाकूरवाडी येथील आदिवासी लोकांच्या वस्तीच्या मागे असलेले धोकादायक दगड हलवण्याबाबतस कोणतीही ठोस भूमिका अजूनही घेतलेली नाही. आदिवासी वसतिच्या मागच्या बाजूला असलेले दगड वन विभागाच्या जमिनीमध्ये असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला हलवता येत नाहीत. मात्र तहसीलदार यांनी ते दगड हलवण्याचे आदेश दिल्यानंतर वन विभागाने सर्व ग्रासनथांना ते दगड हलविण्याबाबत परिस्थितीची माहिती दिली असून ते दगड पावसाळ्यानंतर हलविले जातील असे आश्वसन दिले आहे.दरम्यान पळसदरी ठाकूरवाडीवर कधीही कोसळतील अशा स्थितीत असलेले दगड आता पावसाळ्यानंतरच हटवले जाणार हे जवळपास नक्की झाले आहे.
इरसाळवाडी येथे जुलै 2023 मध्ये दुर्घटना घडल्यानंतर कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेल्या पळसदरी ठाकूरवाडीचे मागे धोकादायक स्थित असलेले दगड खाली कोसळतील अशा स्थितीत आहेत.असे दगड असताना ते काढण्यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे.ते दगड हलवावेत यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एप्रिल2024 मध्ये तहसीलदार यांना अर्ज दिले होते. मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्याने वाडीवर कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड हलविण्यात आलेले नव्हते.मात्र ते सर्व दगड हलविण्यात वन जमिनीचा अडथळा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या पाहणी मध्ये स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेवटी तहसीलदार कर्जत डॉ धनंजय जाधव यांनी वन विभाग यांना ते दगड हटवण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मौजे पळसदरी आदीवासीवाडी येथील टेकडीलगत राखीव वन स.नं. 43 मध्ये असलेले 3मोठे दगड धोकादायक दगड यांची पाहणी वन विभागाने केली
संबंधित क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत असलेने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गटविकास अधिकारी कर्जत व ग्रामविकास अधिकारी पळसदरी यांचेशी समन्वय साधून तातडीने सदरचे दगड पारंपारीक दगड फोडणा-या व्यकर्तीच्या सहकार्याने मान्सून आगमन होण्यापूर्वी शक्य तितक्या जलद गतीने फोडून हटवावे यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरु केले. त्यासाठी मुरबाड आणि लोणावळा येथून दगड फोडणारे कामगार यांना आणण्यात आणले.
दगड फोडण्यासाठी अवधी कमी असल्याने तसेच पाऊस सुतरु झाला असल्याने वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर यांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या समवेत पाहणी केली.त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ देखील उपस्थिती होते. हि पाहणी झाल्यानंतर वन विभाग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी पळसदरी ठाकूर वाडी मध्ये ग्रामस्थांची बैठक घेतली आणि दगड हलवण्यात येत असलेल्या अडचणी यांची माहिती दिली.त्यामुळे आता ते दगड पावसाळा संपल्यावर वन विभाग यांच्या माध्यमातून हलविले जाणार हे ठरवण्यात आले असून वन विभाग ती सर्व कार्यवाही करेल असे आश्वासन ग्रांमस्थांना देण्यात आले आहे. तसेच हा सर्व अहवाल वन विभागाकडून शासनाला देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना देण्यात आले आहेत.