उरणच्या निवडणुकीत होणार काँटे की टक्कर ; तिसऱ्या आघाडीकडून 'या' नेत्याने भरला उमेदवारी अर्ज
रायगड /किरण बाथम :- गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनतेचे, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे.या आघाडीला जनतेतूनही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी तर्फे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदार संघातही चूरशीचा सामना पहावयास मिळणार आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी (तिसरी आघाडी ) तर्फे उरण विधानसभा मतदार संघातून संतोष काटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
संतोष काटे हे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे शहराध्यक्ष आहेत.उरण विधानसभा मतदार संघात वर्षानुवर्षे अनेक समस्या, प्रश्न प्रलंबित आहेत. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने व गोर गरिबांना न्याय मिळावा या हेतूने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.असं संतोष काटे यांनी सांगितलं आहे. उरण मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे माजी आमदार मनोहर भोईर, महायुती तर्फे भाजपचे महेश बालदी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसंच शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रितम म्हात्रे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. याचबरोबर आता तिसऱ्या आघाडीमधून संतोष काटे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे उरणमध्ये चूरशीचा सामना पहायला मिळणार आहे.
संतोष काटे, तिसरी आघाडी उरण विधानसभा उमेदवार
हेही वाचा-“स्वत:च्या भावाला पक्षात ठेवून न्याय देऊ शकले नाहीत”; संदेश पारकर यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
महाराष्ट्रात आजवर महाविकास आघाडी आणि महायुती बरीच वर्ष सत्तेत होते. मात्र आजतागत नागरिकांचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाही. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राकडे विकासाचा ठोस दृष्टीकोन बघायला मिळत नाही.त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या कारभारावर जनता नाराज आहे. असं संतोष काटे यांनी सांगितलं. त्यामुळे आतापर्यंतची सर्व परिस्थिती लक्षात घेत जनतेला तिसऱ्या आघाडीचा पर्याय खुला आहे. जनतेने ठरविले तर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. नागरिकांना आता तिसरा पर्याय योग्य वाटत असल्यामुळे दिवसेंदिवस परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांना जनतेचा पाठींबा वाढतच आहे. त्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर मी नक्कीच निवडून येईल, असा विश्वास संतोष काटे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-… तर हा मला मारण्याचाच कट होता”; सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप
संतोष काटे यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल सांगायचं झालंच तर, मागील दोन दशके काटे राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.गोर गरीब – कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी , रस्ते , स्वछता राखण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनील तटकरे ह्यांचे जवळचे पदाधिकारी आहेत.त्यांनी उलवे व परिसरातील अनेक प्रश्न सोडविले आहेत.त्यांचा जनतेशी दांडगा व तळागाळात जनसंपर्क आहे.उत्तम वक्तृत्व व संभाषण कौशल्य तरुण तडफदार उमेदवार म्हणून संतोष काटे प्रभावी ठरतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.