
गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना काळाचा घाला; मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २५ फूट खोल दरीत दुचाकी कोसळली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील आणि अक्षता कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने जात होते. शनिवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ते खवटी गावाजवळ आले असता दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी महामार्गाच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. दुचाकी थेट खोल दरीत कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करून दोघांनाही दरीतून बाहेर काढले. मात्र, सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. अक्षता कवडे गंभीर जखमी असल्याने तिला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, नवी मुंबईसह विविध भागांतून कोकणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शनिवारी सकाळी मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर माणगाव, इंदापूर आणि नागोठणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. गणेशोत्सवाच्या तोंडावरच चिपळूणकडे जाताना खवटीजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे पोलादपूर आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.