सौजन्य फोटो - AI Gemini
घरात खेळत असताना घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह वलाराकारा परिसरात राहत होते. शुक्रवारी रात्री घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते. दोन्ही मुले घरात खेळत होती. ती रडत नसल्याने त्यांच्याकडे कुटुंबीयांचे विशेष लक्ष गेले नाही. दरम्यान, स्वयंपाकघरात ठेवलेली रसायनाची बाटली अचानक फरशीवर पडली. बाटलीतील द्रव जमिनीवर सांडला. खेळत असलेल्या दोन्ही चिमुकल्यांनी हा द्रव चाखल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल
द्रव चाखल्यानंतर काही वेळातच दोन्ही मुलांची प्रकृती गंभीररीत्या बिघडली. हे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
स्वयंपाकघरात पेंट थिनर आणि किटकनाशकाच्या बाटल्या
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदिमाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी स्वयंपाकघरातून पेंट थिनरची एक बाटली आणि किटकनाशकाची एक बाटली पोलिसांना आढळून आली. दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन आणि वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर रसायन चाखल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला का, याबाबत स्पष्टता मिळणार आहे. या प्रकरणी आदिमाली पोलिसांनी मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.






