सध्या राज्यभर विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले जात असतानाच बंडखोरीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तळकोकणातही ही बंडखोरी उफाळून आली आहे. राजापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनास लाड यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घेणार नाही- अविनाश लाड
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे त्यांनी जाहीर केले असून कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म नक्की मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घेणार नसल्याचेही त्यांनी ठरवले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असून काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये राजापूरची जागा ठाकरे गटाला देण्यात आली असली तरीही, स्थानिक पातळीवर बेबनाव असल्याचे दिसत आहे. याचा थेट फटका मविआचे उमेदवार राजन साळवींना बसणार आहे.
2019 मध्ये लाड यांनी राजन साळवींना दिली होती कडवी लढत
राजापूरमध्ये 2019 मध्ये शिवसेनेचे राजन साळवी आणि अविनाश लाड यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये अविनाश लाड यांनी राजन साळवी यांना कडवी झुंज दिली होती. निसटत्या मतांनी राजन साळवी यांनी अविनाश लाड यांचा पराभव केला होता. त्यामुळे अविनाश लाड हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. ते या मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत मात्र मविआकडून ठाकरे गटाच्या राजन साळवी यांना उमेदवारी दिल्याने त्यांची निराशा झाली असून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजन साळवींसाठी अत्यंत कठीण लढत
राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास, या मतदारसंघाचे गेली सलग तीन टर्म राजन साळवी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी त्यांना महायुतीकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांचे थेट आव्हान आहे. किरण सामंत हे 2024 च्या लोकसभेकरिता उत्सुक होते मात्र त्यावेळी नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली होती. मात्र पक्षाने आता विधानसभेसाठी किरण सामंत यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. किरण सामंत हे राजन साळवी यांच्यासाठी कडवे आव्हान असणार आहे. त्यात कॉंग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करण्याचे ठरवले आहे. जर अविनाश लाड यांची समजूत घालण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश आले तर मात्र यावेळची निवडणूक ही राजन साळवी यांच्याकरिता आतापर्यंतची अत्यंत कठीण निवडणूक असणार आहे.