
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील वालावलकर रुग्णालय डेरवण येथे कर्मचारी राज्य विमा योजना ०१ मे २०२४ पासून सुरु झाली असून, या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा महामंडळाची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे. भारतात लाखोंच्या संख्येने कामगार आहेत. एकाच कार्ड मूळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच वेळी लाभ घेणे जीकरीचे ठरू नये यासाठी इ. एस. आय.सी ने प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘पेहचान कार्ड’ नावाने प्रसिद्ध असलेल्या दोन कार्डस चे वाटप केले आहे. जेणेकरून कुटुंबीय आणि कर्मचारी आपापल्या राहत्या ठिकाणाहून योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव ESIC पॅनलवरील रुग्णालय
डेरवण येथील वालावलकर रुग्णालय हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव ESIC च्या पॅनलवर असलेले रुग्णालय असल्याने संपूर्ण कोकणातील ESIC कर्मचाऱ्यांना वालावलकर रुग्णालयात मोफत उपचार घेणे सोईचे होणार आहे. त्यासाठी बाह्यरुग्ण अंतर्गत उपचार करायचे असल्यास रेफरल लेटर व पेहचान कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास रुग्ण पेहचान कार्ड घेऊन योजनेमध्ये मोफत उपचार घेऊ शकतो. इतर उपचार आंतररुग्ण विभागात करावयाचे असल्यास रेफरल लेटर आणि सर्व कागद पत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
ESIC योजनेबद्दल
भारत सरकारने सुरू केलेली ESIC योजना (कर्मचारी राज्य विमा योजना) ही कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा सार्वजनिक उपक्रम आहे. आरोग्यासंबंधी कोणतीही समस्या जसे की आजारपण, अपंगत्व अथवा कामावरील अपघातांपासून कामगारांचे संरक्षण करणे हा या योजनेचा सर्वात प्राथमिक उद्देश आहे. या योजनेंतर्गत कामगारांना एक आर्थिक सुरक्षा मिळते, ज्यामुळे ते कठीण काळातही सुरक्षित राहू शकतात.
आयुष्मान भारत आणि ESIC
गेल्या महिन्यात ESIC आणि आयुष्मान भारत योजनेसंबंधी मोठी घोषणा करण्यात आली होती. यानुसार कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या वैद्यकीय लाभ परिषदेने लाभार्थ्यांसाठी आरोग्य सेवा वाढवण्यासाठी कर्मचारी राज्य विमा (ESIC) योजना आयुष्मान भारत पीएम-जन आरोग्य योजना (PM-JAY) मध्ये विलीन केली. यासंबंधीच्या निवेदनात कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही योजना एकत्रित करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मुख्य कार्यालयात झालेल्या वैद्यकीय लाभ परिषदेच्या 86 व्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेशी ESIC जोडली गेली आहे.