राजापूर तालुक्यात गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ, भर वस्तीत बिबट्याचा वावर; वनविभागाचा हलगर्जीपणा
राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुक्यातील मौजे करक तांबळवाडी येथील श्री. आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनीवरून दिली. ही घटना सोमवारी घडली. सदर बिबट्याला वनविभागाने सुखरुप ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे .
गेल्या अनेक वर्षापासून राजापूर तालुक्यातील ग्रामिण भागासह राजापूर शहरातही बिबट्याचा मनुष्यवस्तीकडे राजरोस वावर वाढलेला असताना राजापूर वनविभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन सुसेगाद पहुडलेले आहे .राजापूर शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकणी बिबट्याने काहीजणांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मात्र एवढं होऊनही राजापूर वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ होत असताना देखील कोणतंही ठोस पाऊल वनविभागाकडून उचललं जात नाही. ववविभागाला केवळ जंगलतोड करुन वनसंपदा नष्ट कर्ण्यासाठीच शासनाने सेवेत घेतले आहे का ? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उरस्थित केला आहे.
बिबटया अडकल्याची माहिती वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रिन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेऊन पशुधन विकास अधिकारी राजापूर यांचेकडून तपासणी केली असता, सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी दिली.
कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.