
Mharashtra Politics: "...अशी घटना पहिल्यांदाच घडली"; मंत्री योगेश कदमांचे निवडणुकीबाबत भाष्य
नियोजनातील गोंधळामळे त्रटी : मंत्री योगेश कदम
निवडणूक आयोगावर त्रुटींवरून टीकास्त्र
गोंधळ पुन्हा होणार नाही याची खात्री करण्याची आवश्यकता
खेड: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत यापूर्वी कधीही न पाहिलेला गोंधळ या वेळी अनुभवास आला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हे निकाल तब्बल २० ते २१ दिवस उशिरा जाहीर होणार आहेत.
निवडणूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक…
राज्यातील निवडणुकांच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत असल्याचे सांगत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निवडणूक आयोगावर नियोजनातील त्रुटींबाबत टीका केली. काही ठिकाणी निवडणुका रद्द झाल्यामुळे त्याचा परिणाम आगामी नगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात चिऊन न्यायालयाने निकाल स्थगित करण्याचा निर्णय चेतला. खंडपीठाचा आदेश लागू होणार असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी न्यायालयाने हे पाऊल उचलले, असे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र निकाल जाहीर करण्यातील विलंब हा प्रशासनाच्या नियोजनातीला मोठ्या गोंधळाचा परिणाम असल्याचा आरोपही कदमा यांनी केला. ‘मतदानानंतरच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्याची पद्धत असताना अचानक २०-२१ दिवसांचे अंतर निर्माण होणे हे निवडणूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक आहे’, असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी काटेकोर आणि अचूक नियोजन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गोंधळ पुन्हा होणार नाही याची खात्री करावी…
निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा गोंधळ पुन्हा होणार नाही याची खात्री करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना मंत्री कदम म्हणाले की, ‘निवडणुका हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे. अशा प्रशासकीय चुका नागरिकांचा विश्वास डळमळीत करू शकतात. त्यामुळे भविष्यातील प्रत्येक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असणे गरजेचे आहे.’
EVM सुरक्षेसाठी ‘Z प्लस’ सुरक्षा आणि जॅमरची मागणी
चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया ०२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली असून, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मित्रपक्षांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकारी, चिपळूण यांच्याकडे एक महत्त्वाचे आणि आग्रही निवेदन सादर केले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मतदान यंत्रणा (EVM) ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम्सच्या सुरक्षेमध्ये वाढ, नेटवर्क जॅमर बसवणे, सीसीटीव्ही कव्हरेजची मागणी आणि मतमोजणीच्या दिवशी संचारबंदी लागू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.