
फोटो सौजन्य - Social Media
भिवंडी व मालेगाव परिसरात माता-बाल आरोग्य क्षेत्रात सातत्याने आणि प्रभावी काम करणाऱ्या कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) या संस्थेला ‘सीएसआर हॅट सोसिओ स्टार अवॉर्ड्स २०२५’ अंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य व कल्याण या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रभरातील स्वयंसेवी संस्थांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी मुंबईस्थित सीसीडीटीची निवड झाली.
सीसीडीटीने २०२० ते २०२५ या कालावधीत भिवंडी व मालेगाव भागात माता-बाल आरोग्य प्रकल्प राबवला. गर्भावस्थेतील व प्रसूतीनंतरच्या काळातील काळजीबाबत जनजागृती वाढवणे, माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, घरगुती प्रसूतीचे प्रमाण घटवणे तसेच बाल लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होते. समुदायस्तरावर थेट मातांशी आणि कुटुंबीयांशी संवाद साधत, योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली.
बाह्य संस्थेमार्फत प्रभाव मूल्यमापन (इम्पॅक्ट स्टडी)
या प्रकल्पाच्या परिणामांचे शास्त्रीय मूल्यमापन करण्यासाठी सीसीडीटीने बाह्य संस्थेमार्फत इम्पॅक्ट स्टडी करून घेतली. या अभ्यासातून बाल लसीकरणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे, तसेच मातांमध्ये लसीकरण, पोषण आहार व आरोग्यदायी सवयींबाबतचे ज्ञान वाढल्याचे स्पष्ट झाले. आहाराच्या सवयींमध्येही सकारात्मक बदल दिसून आला. प्रकल्पाशी संबंधित अहवाल, माहिती-शिक्षण-संवाद (IEC) साहित्य, व्हिडिओ व डेटा संस्थेकडे सादर करण्यात आला होता.
फिल्ड टीमचे अथक परिश्रम
या सन्मानामागे सीसीडीटीच्या मॅनेजिंग ट्रस्टी सुकन्या पोद्दार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच भिवंडी व मालेगाव येथील समर्पित फिल्ड टीमचे अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळातही टीमने धार्मिक नेते, आयसीडीएस कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि स्थानिक समुदाय यांच्याशी समन्वय साधत प्रभावी काम केले. प्रत्यक्ष घरभेटी, समूह चर्चा, सल्लामसलत आणि सातत्यपूर्ण फॉलो-अपमुळे प्रकल्पाचा प्रभाव अधिक व्यापक झाला.
६२ स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन अंधेरी येथील कोहिनूर कॉन्टिनेंटल हॉटेल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुमारे ६२ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. सीसीडीटीच्या वतीने समुदाय उपक्रम प्रमुख रामचंद्र अडसुळे आणि प्रकल्प समन्वयक नीता जगताप यांनी पुरस्कार स्वीकारला. सीसीडीटीला मिळालेला हा सन्मान संस्थेने आपल्या फ्रंटलाईन वर्कर्सना समर्पित केला आहे. माता-बाल आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाची ही दखल भविष्यातील उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.