पाटण : पाटण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain in Patan) संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी तालुक्यातील पाच गावातील ८० कुटुंबातील ३१० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याची माहिती पाटणचे तहसीलदार रमेश पाटील (Ramesh Patil) यांनी दिली.
सध्या पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गतवर्षीचा नैसर्गिक आपत्तीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने यावेळी सुरुवातीपासूनच खबरदारी व उपायोजनांसाठी पूर्वतयारी केली आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहेत.
असे आहे स्थलांतर…
खबरदारी म्हणून जोतिबाचीवाडी येथील पाच कुटुंबातील १८ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, जोतिबाचीवाडी व काहींना नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. खुडूपलेवाडी येथील ११ कुटुंबातील ७४ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा खुडुपलेवाडी, मोरगिरी येथील सहा कुटुंबातील ३२२ नागरिकांना नातेवाईकांकडे, जितकरवाडी (जिंती) येथील २६ कुटुंबातील ५८ नागरिकांना विजय कांबळे हायस्कूल जिंती येथे तर म्हारवंड येथील ३२ कुटुंबातील १२८ नागरिकांना शासकीय निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींसाठी सर्वतोपरी खबरदारी व उपायोजना सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनीही आपला जीव धोक्यात घालून कोठेही धोकादायक ठिकाणी वास्तव करू नये. स्थानिक नागरिकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. नागरिकांनी आपत्तींची माहिती तत्काळ स्थानिक महसूल विभागाला कळवावी.
– रमेश पाटील, तहसीलदार, पाटण.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा…
पाटण-चापोली रस्त्यावरील ठिकठिकाणी गेल्या वर्षी पुलाचा भरा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या विभागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. हे पूल पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावे, याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी तसेच बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, याकडे लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या पुलांची फक्त थातूरमातून डागजोगी करण्यात आली.
बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच हे दुरुस्त साकवपूल दुरुस्त केले असते. तर अशी वेळ ग्रामस्थांवर आली नसती याला जबाबदार असणाऱ्या बाधंकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.