नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्ग विरोध
सांगली : नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्ग हा अनावश्यक लादला जातोय. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ता कुणाच्या कोटकल्याणासाठी केला जातोय? तो स्थगित करण्याची घोषमा भ्रम निर्माण करणारी आहे. तो रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करत आज काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. महामार्ग विरोधी कृती समितीला काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या (ता. २२) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी आम्ही सर्वपक्षिय आमदारांना अडवू. त्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करायला लावू, त्यानंतरच आत सोडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हा नियोजन समितीत महामार्ग रद्दचा ठराव घ्या, अशी मागणीदेखील करण्यात आली. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील, कृती समितीचे उमेश देशमुख, सतीश साखळकर, दिगंबर कांबळे, भूषण गुरव आदी उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करताय? हा समांतर रस्ता कुणाच्या विकासासाठी केला जातोय? शेती पूर्ण उद्ध्वस्त करून रस्ते बांधणे योग्य आहे का? आम्ही ज्या मार्गांची गरज आहे, त्याच्या पाठीशी आहोत, विकास गरजेचा आहे. जतमध्ये चांगले रस्ते करा. दुष्काळी भाग चांगल्या रस्त्यांनी जोडा. शक्तीपीठसारखा समांतर रस्ता अनावश्यक आहे आणि तो रद्दच झाला पाहिजे.’’ आमदार विक्रम सावंत म्हणाले, ‘‘कुणीतरी रात्री स्वप्नात एक रस्ता पाहिले आणि सकाळी उठून जाहीर केला, असे शक्तीपीठचे झाले आहे. गरज नसताना महामार्ग बांधून शेतकऱ्यांना भूमीहीन करू नका, काँग्रेस हे होऊ देणार नाही.’’
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘भूसंपादनाला स्थगिती हे ढोंग आहे, रस्ता रद्द झाला पाहिजे. जिल्ह्यातील १३०० एकर शेती त्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे. समृद्धी महामार्गाने एक विधानसभा निवडणुकीचा खर्च तुम्ही काढला, शक्तीपीठच्या माध्यमातून सरकार २०२४ च्या निवडणूक खर्चाची तयारी करते आहे का?’’
जयश्री पाटील म्हणाल्या, ‘‘शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती नकोय, तो रद्द झाल्याची घोषणा होईपर्यंत काँग्रेस लढत राहणार आहे.’’
उमेश देशमुख म्हणाले, ‘‘या महामार्गाने सांगलीला महापुराचा मोठा फटका बसणार आहे. सांगली शहर आणि अनेक गावे त्यात बुडतील. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या पाहिजेत.’’ सतीश साखळकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १३०० एकर शेती आणि ५३७० शेतकरी बाधित होणार आहेत. काही नेते तोंडी स्थगितीची घोषणा करताहेत, मात्र आम्ही रस्ता रद्द झाल्याची अधिसूचना निघाल्याशिवाय गप्प बसणार नाही. आगामी विधानसभेला याचे परिणाम भोगावे लागतील.’’ प्रा. सिकंदर जमादार आदी उपस्थित होते.
पुलांचे जाळ अन् महापुराला निमंत्रण
प्रतीक पाटील यांनी कृष्णा नदीवर पुलांचे जाळे विणले जात असून ते महापुराचे मोठे कारण ठरणार असल्याची टीका केला. त्यावर पृथ्वीराज पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हट्टामुळे आयर्विनला समांतर आणि हरिपूर-कोथळी हे अनावश्यक पूल झाल्याची टीका केली.