
buldhana gajanan maharaj palkhi
बुलढाणा: विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथील संत गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी पंढरपूरसाठी (Shegaon To Pandharpur Wari) रवाना झाली आहे. अश्व, 500 पताकाधारी वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले असून, पायदळ वारीचे हे 54 वे वर्ष आहे. गण गण गणात बोते आणि हरिनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात ही पालखी निघाली आहे. पालखीला सर करण्यासाठी हजारो भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले होते. सकाळी मंदिरात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा पार पडल्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली.
नागझरी रोडवरील युवराज देशमुख यांच्या मळ्यात चहापाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी नागझरी मार्गे जाणार असून मुक्काम पारस येथे राहणार आहे, त्यानंतर निमकर्दा, गायगाव, भोरद मार्गे पालखी अकोला शहरात दाखल होणार आहे. अकोला येथे पालखीचा 2 दिवस मुक्काम असून तिथून पुढे वाडेगांव मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे, 27 जून रोजी पालखी पंढरपूर येथे पोहचणार असून 27 जून ते 2 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम राहणार आहे. तर 3 जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे. 23जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचणार आहे.
खडतर मार्गावरूनच वारकऱ्यांचा प्रवास
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीमध्ये संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायी वारी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी समजली जाते. ही पालखी आज पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली आहे. मात्र शेगाव ते नागझरी मार्ग खराब झाला असून याच मार्गावरून पालखीतील वारकऱ्यांना चालावं लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात भाविकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष
शेगांव-अकोला हा खराब झालेला हा रस्ता अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे गजानन महाराजांची पायी वारी निघण्यापूर्वीच रस्त्याचं बांधकाम करावं, अशी मागणी नागझरी येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बऱ्याच दिवसांपासून केली होती. मात्र या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येत आहे. खरतर याच मार्गाने वर्षभर भाविक पायी वारी करत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. अखेर आज गजानन महाराजांच्या पालखीत सहभागी झालेल्या या वारकऱ्यांना सुद्धा याच खडतर मार्गावरून चालावे लागत असल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे.