Sarangi Mahajan's allegations against Munde brother sister
परळी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकासंमोर थेट आव्हान देणार आहेत. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदावारी देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पहिल्यांदाच पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. त्यामुळे परळीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता मुंडे भावंडावर दिवंगत नेते प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले आहेत. याच मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याचा आरोप दिवंगत नेते प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 एकर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतल्याचा आरोप सारंगी महाजन केला आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन?
पत्रकार परिषदेमध्ये सारंगी महाजन यांनी जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाल्या की, परळीत माझी जमीन होती, ३६ आर. जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असे गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
हे देखील वाचा : आधी जोरदार टीका नंतर दिलगिरी; वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांचा ‘यू टर्न’
पुढे सारंगी महाजन यांनी खटला सुरु झाल्याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “या प्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 ला दावा दाखल केला असून, त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर 25 नोव्हेंबर रोजी पुढील तपासणी होणार आहे. तसेच या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यासदंर्भात लवकरच बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही सारंगी महाजन यांनी सांगितले आहे.