यंदा समुद्राला येणार 18 दिवस मोठी भरती; जाणून घ्या काय सांगतो हवामानाचा अंदाज?
अलिबाग : कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. 26, 27 जून आणि जुलै महिन्यात सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाण येत असते. याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार, आता हा नवा अंदाज आहे.
समुद्राच्या या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बरेचदा तडाखा बसत असतो. त्यामुळे पावसाळापूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात. यावर्षी पावसाळ्यात 18 दिवस मोठी उधाण येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जूनमधील पाच, जुलैमधील चार, ऑगस्टमधील पाच, आणि सप्टेंबरमधील चार दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटरपेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, या उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी केली जाते.
नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर एकूण ३८५ गावे आहेत.