
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. (मास्टर ऑफ सोशल वर्क) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्यांतर्गत गटकार्य उपक्रमासाठी वाळकी येथील आधार गतिमंद विद्यालयाची निवड केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, गरजा आणि सामाजिक जाणीव यांचा अभ्यास केला. समाजकार्याच्या दृष्टीने संवेदनशीलता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या क्षेत्रकार्याचा भाग म्हणून राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आधार गतिमंद विद्यालयात ‘राष्ट्रीय बालिका दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महिलाशिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि बालिकांचे हक्क यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका आशाताई पुंड या होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बालिकांच्या शिक्षणाचे, आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे महत्त्व विशद केले. “आजच्या काळात बालिकांना केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक पाठबळ देणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास चैताली कामखेडे, अनिता वाशिमकर, सुचिता चरपे, संदीप पुंड, रामेश्वर नव्हाळे, रवींद्र हरीमकर, योगेश सावसुंदर तसेच क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. यू.एस. जमधाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी बालिका दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. समाजात बालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असून, त्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बालिकांच्या हक्कांवर, शिक्षणाच्या संधींवर आणि लैंगिक समानतेवर आधारित संवादात्मक उपक्रम राबवले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागली असून, बालिकांच्या सक्षमीकरणाबाबत सकारात्मक विचार रुजवण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप सानप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या एम.एस.डब्ल्यू. भाग एकच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळाल्याने त्यांच्यात समाजभान आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.