फोटो सौजन्य - Social Media
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून, एकत्रित प्रयत्नांतून वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनवता येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. भारतीय संविधानातील मूल्यांनुसार वाटचाल करत विकासाची नवी शिखरे गाठूया, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार (दि. २६) रोजी वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेती, रोजगारनिर्मिती, पाणी व्यवस्थापन, रस्ते, घरकुल योजना, महिला सक्षमीकरण, तरुणांचे कौशल्य विकास तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असून ही बाब समाधानकारक आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. मात्र राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ४३१ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६९ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, ‘उमेद’ अभियानातून ४० हजार महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. चालू वर्षात आणखी ३६ हजार महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट आहे.
ध्वजारोहणानंतर विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यात वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड, राष्ट्रीय छात्रसेना, स्काऊट-गाईड, सैनिकी शाळेचे विद्यार्थी, पोलिस बॅण्ड, शीघ्र कृती दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक व्हॅन, वॉटर कॅनन, रुग्णवाहिका व अग्निशमन दल सहभागी झाले होते.
यावेळी वीरपत्नी पार्वतीबाई लहाने, वैशाली गोरे व मीराबाई नागुलकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक, वीरमाता-पिता, वीरपत्नी, लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






