फोटो सौजन्य - Social Media
नेरळ कोळीवली येथे सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळ्याला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेल्या कोळीवली गाव व परिसराच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या उपक्रमाचे २५ वे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. श्री संत सेवा वारकरी संप्रदाय मंडळाच्या पुढाकाराने हा पवित्र सोहळा २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोळीवली येथे संपन्न होत आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आज पहाटे काकड आरती व भजनाने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणास प्रारंभ करण्यात आला. कोळीवली गाव व परिसरातील वारकरी संप्रदायाच्या भक्तीमुळे हा सोहळा गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू असून, या माध्यमातून वारकरी परंपरा अधिक दृढ होत आहे. साडेतीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात प्रवचन, हरिकीर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, काकड आरती, जागर भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या सुवर्णमहोत्सवी हरिनाम सोहळ्यात नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. ह.भ.प. महादेव महाराज शिंदे (देवाची आळंदी), ह.भ.प. जयश्रीताई घोरट (देहनोली, मुरबाड) आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कोठुळे (बीड) यांची हरिकीर्तने होणार आहेत. तसेच काल्याचे कीर्तन ह.भ.प. कैलास महाराज भोईर यांच्या वतीने होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकड भजन, सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते २ संगीत भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ संगीत भजन आणि रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व त्यानंतर जागर भजन असा आखलेला आहे. हा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळा ह.भ.प. श्री कैलास महाराज भोईर यांच्या देखरेखीखाली पार पडत असून, पंढरीनाथ तांबोळी, बळीराम भागीत, विजय महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे व्यवस्थापन ह.भ.प. दिगंबर पंढरीनाथ तांबोळी (अध्यक्ष), प्रमोद परशुराम तांबोळी (सचिव), ह.भ.प. बळीराम भागीत (खजिनदार) तसेच व्यवस्थापक सदस्य व ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने अविरतपणे सुरू आहे. कोळीवली परिसरात या हरिनाम सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.






