जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे
मनोज जरांगे पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली. मराठा उमेदवारांना अर्ज माघार घेण्याचंही त्यांनी आवाहन केलं. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलन किंवा इतर कोणत्याही या महाविकास आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निवडणूक लढण्याचा निर्णयही त्यांचाच होता. आता ते निवडणुकीतून माघार घेत आहेत, मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकच कारण आहे. त्यांनी प्रत्येकवेळी सांगितलं आहे की त्यांचा भाजपला विरोध आहे. पण भाजपाविरोधात लढले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- “आता मराठा समाज मोकळेपणाने…”; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयावर भुजबळांची सूचक प्रतिक्रिया
मनोज जरांगें काय म्हणाले?
एका जातीच्या राजकारणावरून कोणीही निवडणूक लढवू शकत नाही. राजकारणातील एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. त्यामुळे राजकीय प्रक्रिया हाताळणं ही काही सोपी गोष्ट नाही. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची, मतदारांची गोळाबेरीज करावी लागते. असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली.
मराठा आरक्षणाच्या सुरुवातीपासून भाजपला टार्गेट करण्यात आलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील महायुतीविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता होती. आता त्यांनी माघार घेतल्यानंतर महायुती आणि विरोधकांकडून महाविकास आघाडीच्या सांगण्यावरून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या कोणत्याही भूमिकेशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं.
जरांगेंवर कोणी दबाव टाकला?
महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही आणि जर टाकला तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन. तसंच मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.