Sharad Pawar reaction on saif ali khan health live- update in hindi actor saif ali khan attacked with a knife
बारामती : बॉलीवुडमधील लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वांद्रेमधील त्याच्या राहत्या घरी हा हल्ला करण्यात आला. रात्री 2 वाजता घरी शिरलेल्या चोरांनी सैफवर हल्ला केला. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यामध्ये सैफवर सहा वार करण्यात आले आहेत. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थीर असून लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली असून यावर आता राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावर आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या या जीवघेणा हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी यावरुन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आता या प्रकरणामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रतिक्रिया व्यक्त केली असून या प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले शरद पवार?
जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, “कायदा सुव्यवस्था किती ढासाळतेय हे लक्षात येतंय. याच भागात एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहे. राज्य सराकरने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं”, अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या हल्ल्याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
जितेंद्र आव्हाडांना भलताच संशय
त्याचबरोबर शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरुन गंभीर संशय व आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे देखील म्हटले होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे.त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे.हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.