मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी लोकसभेमध्ये आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देता कामा नये ही भूमिका मांडली. या भूमिकेचे आता महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट राजेंद्र गावित यांचा निषेध व्यक्त करीत इशारा दिला आहे. तसेच, राजेंद्र गावित यांना मुख्यमंत्र्यांनी योग्य ती समज द्यावी असे देखील पडळकर यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र गावित यांनी केलेल्या वक्तव्य संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचीही भेट घेणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. राज्यात धनगर आरक्षण हा अनेकांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या संदर्भात लोकसभेत राजेंद्र गावित आणि हिना गावित (Heena Gavit) यांनी धनगर आरक्षणाला विरोध केला आहे. तर, सुप्रिया सुळे यांनी हा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना राजकारण करीत आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे हे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्टीकरण राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना द्यावे लागले. याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. धनगर समाज या संदर्भात आंदोलन करण्याची शक्यता आहे.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बहुजन विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा, बहुजन समाजातील विविध समस्यांचा धोरणात्मक अभ्यास व्हावा, या हेतूने आपण बार्टीच्या धर्तीवर सारथी, महाज्योती, अमृत सारख्या संस्थांची निर्मिती केली. परंतु महाविकास आघाडीच्या काळात या संस्थांना फक्त स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसकडून मलिदा खाण्याची यंत्रणा म्हणून पाहण्यात आले अशी टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.