उद्धव ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका
मुंबई : आज मुंबईमध्ये विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानानंतर ठाकरे कुटुंबाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर उद्यापासून होणाऱ्य़ा पावसाळी अधिवेशनावर प्रतिक्रिया दिली. खोके उद्यापासून खोके सरकारचं निरोपाचं अधिवेशन असेल अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन जोरदार गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ”उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे. सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे चहापान घ्यायला फक्त सत्ताधारी पक्ष आल्याचे दिसून आले.
राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून पार पडणार आहे. लवकरच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता बांद्रा ताज लँड हॉटेलला बैठक बोलवण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.