सिंधुदुर्ग आरटीओची खाजगी बसेस वर कारवाई; मात्र ही तर फक्त धूळफेक ! मनसे उपजिल्हाध्यक्षांचा आरोप
सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या पथकाने गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली व ओसरगांव या दोन चेक नाक्यावर ९१ खाजगी बसची तपासणी केली.मात्र केवळ २० गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून २ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.आरटीओच्या या धडक कारवाई मुळे खाजगी बस चालक -मालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खाजगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. शासनाच्या बसेस मधून मोटार सायकल, खाजगी सामान, यासह सध्या आंबा सीजन असल्यामुळे आंब्याच्या पेट्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शनिवार दि.५ रोजी इन्सुली चेक पोस्ट व रविवार दि.६ मार्च रोजी ओसरगांव चेक नाक्यावर धडक कारवाई करत खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली.यामध्ये एकूण ९१ बसेस तपासण्यात आल्या. यापैकी २० गाड्यां मध्ये आंब्याच्या पेट्या व इतर खाजगी साहित्य आढळून आल्याने कारवाई करत २ लाख १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.दरम्यान ही कारवाई यापुढे ही अशीच सुरू राहणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले.
सायबर चोरट्यांनो खबरदार! गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी…; CM फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
सिंधुदुर्गात आरटीओ मार्फत सुरू असलेल्या खाजगी बसवरील कारवाईमध्ये पारदर्शकता नसुन केवळ धुळफेक आहे. असा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. गेली अनेक वर्षे खाजगी बसेस मार्फत प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना सुद्धा मुंबईवरून गोव्याच्या दिशेने व गोव्यावरून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. यावर अनेक वाहतूक संघटनांनी आंदोलने केली, निवेदने दिली तरीसुद्धा आरटीओ मार्फत कोणतीही कारवाई होत नव्हती.अलिकडेच सिंधुदुर्ग आरटीओ विभागाला मनसेने टेम्पो (गुड्स) वाहतूक युनियन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांना सोबत घेऊन मनसे स्टाईल रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता,त्यानंतर आरटीओने ही मार्फत कारवाई करण्यात आली आहे.आरटीओची कारवाई ही धुळफेक असुन याबाबत लवकरच मनसे स्टिंग ऑपरेशन करून ही बाब परिवहन आयुक्तांच्या नजरेत आणून देणार असल्याचे किनळेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग आरटीओने कारवाई केलेल्या खासगी बसेस कुणाच्या होत्या ? याबाबत सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांना विचारले असता त्या बसेस मालकांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.दंडात्मक कारवाई करुन सुध्दा आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या बस मालकांची नावे सांगण्यास का टाळाटाळ केली? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.