सोलापूर विद्यापीठाच्या 251 कोटी 36 लाख 25 हजारांच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी* विद्यार्थी विकास व संशोधनासाठी भरीव तरतूद!
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 205 कोटी 6 लाख 82 हजार रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरून 251 कोटी 36 लाख 25 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात 46 कोटी 29 लाख 43 हजार रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सदस्य सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले. या बैठकीत वित्त व लेखा अधिकारी सीए. डॉ. महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले.
विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्याने पाच टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत, विकास योजना भाग एक- शासन अनुदान तसेच विकास योजना भाग दोन- विद्यापीठ निधी अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच संशोधन कार्य, विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अधिसभा सदस्यांनी चर्चा करून दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला एकमतानी मंजुरी दिली.
अधिसभेच्या बैठकीत सुरुवातीला मागील इतीवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला. अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर सदस्यांनी काही ठराव मांडले. ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, सचिन गायकवाड, महादेव कमळे, समाधान पवार, सिनेट सदस्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. भगवान आदटराव यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.
अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे