
Someshwar Sahakari Sakhar Karkhana, Rajvardhan Shinde Chairman Someshwar
राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थिती ही निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर व तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदार पार्थ पवार यांच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलेले राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्ष पदासाठी संग्राम सोरटे यांचे नाव दिले. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दोन्ही पदासाठी एकच नाव आले असल्याने शिंदे व सोरटे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
राजवर्धन शिंदे बारामती तालुक्यातील मुरूम गावचे असून त्यांनी यापूर्वी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय २००५ ते २००७ या काळात ते कारखान्याचे बिनविरोध अध्यक्ष होते. २०१० ते २०१३ या कालावधीत ही त्यांनी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. सन २०२१ ते २०२६ या काळातही ते संचालक होते. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली.
निवडीनंतर बोलताना ते म्हणाले की, ” दिवंगत अजितदादांमुळे मला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मला शिकता आले. दादांच्या नंतर त्यांच्या कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहता आले याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात सोमेश्वरच्या विक्रमी भावाची परंपरा कायम ठेवू. सध्या दुष्काळी परिस्थिती असली तरी मला या परिस्थितीत काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे संचालक मंडळ, अधिकारी, कामगार व सभासद यांच्या सहकार्याने हा हंगाम यशस्वीपणे पार पाडू.
कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील संग्राम सोरटे यांना संधी देऊन सुनेत्रा पवार यांनी सामाजिक समीकरण साधले. संग्राम सोरटे हे दुसऱ्यांदा ब वर्ग संस्था प्रतिनिधी या प्रवर्गातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. नवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत त्यांना सहकार व शेती क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक सहकारी संस्था, पतसंस्था, दूध उत्पादक संस्था यशस्वीपणे चालवल्या असून अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी देऊन सुनेत्रा पवार यांनी ओबीसी समाजाला न्याय दिल्याचे बोलले जात आहे. या निवडीनंतर संग्राम सोरटे म्हणाले की, याप्रसंगी स्वर्गीय अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मात्र येणाऱ्या काळात कारखान्याचा कारभार पारदर्शक, काटकसरीने करून समस्यांच्या हितासाठी चोवीस तास काम करण्याची आमची तयारी आहे.
कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन शिंदे व उपाध्यक्ष संग्राम सोरटे हे गेल्या संचालक मंडळात सुद्धा होते. संचालक मंडळाच्या बैठकीत राजमाता जिजाऊ सभागृहात ते नेहमी एकमेकांच्या शेजारी बसायचे. आता हे शेजारी बसणारे दोन संचालक कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बनले हा योगायोग असल्याचे बोलले जात आहे.