नाशिक-सिन्नर मार्गावर धावत्या बसला आग (संग्रहित फोटो)
नाशिक : नाशिक-सिन्नर महामार्गावर धावत्या एसटी बसला आग लागली. नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ अचानक भीषण आग लागली. सुदैवाने, या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मात्र, या आगीत एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ ते ५:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उन्हाची तीव्रता अधिक असताना धावत्या बसमधून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. या भीषण आगीमुळे नाशिक-सिन्नर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आग विझवल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वाढत्या तापमानाचा झाला परिणाम?
वाढत्या तापमानामुळे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अशा आगीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहनांची नियमित देखभाल आणि तपासणी करण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
रांजणगावातही धावत्या बसला आग
दुसऱ्या एका घटनेत, पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका चालत्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. परंतू बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्यामुळे बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस रस्त्याच्या कडेलाच असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास विस्काळीत झाली होती.






