परभणी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान गाडी तोडफोडीनंतर राज्यात वातावरण तापलेले असतानाच वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार, देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय?, तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मिटकरींची का फोडली गाडी?
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली.