म्हसवड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व सगे सोयर अद्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी रास्ता रोको करण्याचे सांगितले होते. याला म्हसवड शहरात जोरदार प्रतिसाद मिळाला असून मराठा समाजबांधवांकडून सातारा महामार्ग काही काळ रोखण्यात आला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शिवण्यासाठी राज्यभरातील मराठा समाज एकवटला असून जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्या – टप्याने आंदोलने केली जात आहेत. सदरच्या आंदोलनाची झळ म्हसवड शहरात येऊन धडकली असून येथील मराठा समाजाने एकत्र येत शहरातील शिंगणापुर चौक येथील रस्त्यावर ठाण मांडत काही काळ सातारा महामार्ग रोखुन धरला. यावेळी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्याचबरोबर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी माणचे नायब तहसीलदार श्रीशैल्य वट्टे यांना निवेदन दिले. यावेळी म्हसवड पोलीस स्टेशन चे स.पो.नि. शिवाजी विभुते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.