आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
अमरावती : मेळघाटातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून अपघात झाला. यामध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनी सुमरती सोमा जामुनकर हिचा मृत्यू झाला. तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर शवविच्छेदनावरून नातेवाईकांनी विरोध केल्यामुळे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमरती (वय 14, गागारखेडा, ता. चिखलदा) व तिच्या मैत्रिणी मंगळवारी सायंकाळी जेवणानंतर पाण्याच्या टाकीजवळ भांडी धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान टाकीच्या भिंतीचा भाग अचानक कोसळला. यात सुमरतीचा जागीच मृत्यू झाला आणि राधिका जामुनकर, अनिशा सेलूकर, राणी धांडे या तीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका विद्यार्थिनीवर शस्त्रक्रिया सुरू असून; इतर दोघींच्या हाडांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
शवविच्छेदनास नकार; 20 तास मृतदेह रुग्णालयातच
सुमरतीचा शाळेतील पाण्याच्या टाकीची जीर्ण भिंत कोसळल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. तहसीलदार, टीएचओ यांची चौकशी समिती बसविण्यात आली असून, चौकशीअंती पुढील कारवाई करू. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना एक लाख शासन व एक लाख संस्थेकडून सानुग्रह देण्यात येणार असल्याची माहिती धारणीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी मोहन व्यवहारे यांनी दिली.
आमदार हेच संस्थेचे सचिव
पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, ती आश्रमशाळा आदिवासी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांची असल्याची माहिती समोर येत आहे. ते संस्थेचे सचिव असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढत आदिवासी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
पटेल यांची अडवणूक
राजकुमार पटेल व मृत मुलीचे नातेवाईक मृतदेह घेऊन धारणी येथील प्रकल्प कार्यालयात निघाले होते. दरम्यान, त्यांना धारणी रोडवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी अडविले, रात्री 9 वाजता हा प्रकार सुरू होता. मृतदेह रात्रीच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, तब्बल 12 तासांपर्यंत शाळेकडून कुठलाही प्रतिनिधी रुग्णालयात आला नाही.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. मृताच्या नातेवाईकांनी सुध्दा दोषींवर कठोर कारवाई करून, मृताच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत करण्याची मागणी केली आहे.
हेदेखील वाचा : Ulhasnagar Crime : जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्…. ; अंगावर काटा आणणारा आत्महत्येचा थरार