गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या (File Photo : Suicide)
उल्हासनगर शहरात आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंगावर काटा आणणारा असा हा आत्महत्येचा थरार आहे. बुधवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कॅम्प ५ परिसरातील लक्ष्मीनारायण पॅलेस या सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवत आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत व्यक्तीची ओळख विजयकुमार भोजवानी अशी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री विजयकुमार भोजवानी हे आपल्या सोसायटीच्या टेरेसवर गेले होते. बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने सोसायटीतील काही रहिवाशांना शंका वाटली. त्याच दरम्यान टेरेसकरुन धूर निघताना दिसला. काही रहिवाशांनी त्वरित टेरेसकडे धाव घेतली असता त्यांना विजयकुमार भोजवानी हे आगीच्या ज्वाळांमध्ये सापडले.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर विजयकुमार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी एक रिकामी ज्वलनशील द्रव्याची कॅन आढळून आली असून, यावरून आत्महत्येचा संशय अधिकच बळावला आहे. विजयकुमार यांनी ही टोकाची कृती नेमकी का केली, यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. विजयकुमार भोजवानी हे आपल्या कुटुंबासह याच सोसायटीत राहत होते. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मृत्यूचे नेमके कारण पुढील तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.