Parbhani Violence: "परमेश्वराने हा देश त्यांच्या हाती..."; राहुल गांधींच्या आरोपांना मुनगंटीवारांचे चोख प्रत्युत्तर
Sudhir Mungantiwar: परभणी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्याच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परभणीतील रेल्वे स्थानकाबाहेर 10 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हिंसाचाराच्या बातम्या आल्या होत्या. स्मारक पाडण्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला होता. मात्र परभणीत झालेल्या हिंसचारानंतर जवळपास 10 टे 12 दिवसांनी विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर होते. राहुल गांधी यांनी त्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, “मी सोमनाथ सुर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल पाहिला, त्यांचे व्हिडीओही पाहिले, फोटोग्राफ पाहिले. ते पाहिल्यावर 99 नाही तर 100 टक्के सांगतो. त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. ते दलित आहेत. ते संविधानाचे संरक्षण करत होते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच संविधान संपवण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आलं आहे. यामुळे या घटनेला मी त्यांचा हत्या करण्यात आल्याचे म्हणणार आहे.
ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते ही सुर्यवंशी याच्या हत्येसाठी जबाबदार आहेत. पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
हेही वाचा: Rahul Gandhi On Parbhani Violence: सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू नव्हे हत्या….; राहुल गांधींचा आरोप
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
राज्यात सत्तेत येण्याचे स्वप्न पाहिल्यानंतर जेव्हा एखादा नेता तोंडघशी पडतो. तेव्हा नेता अपयशी आहे असे वाटू नये यासाठी सहजपणे सांविधानिक पदावर असणारे इतक्या सहजपणे खून असे म्हणत आहेत. जसे हे काही पोलीस स्टेशनला जाऊन पुरावेच राहणार आहेत. संशय व्यक्त केला तर संजू शकतो. पण ते इतक्या विश्वासाने सांगत आहेत, जसे हे काही स्वतः साक्षीदार आहेत. खरे तर परमेश्वराने हा देश त्यांच्या हाती दिला नाही, सुरक्षित ठेवला त्यासाठी देवाचे अक्षरशः आभार मानले पाहिजेत.
नेमकं काय झालं होतं 10 डिसेंबरला
सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने 10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकासमोरील आंबेडकर स्मारकाच्या काचा फोडून संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले होते. यानंतर लोकांनी पवार यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी लोकांनी आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली होती. या बंदीच्या काळात हिंसाचार उसळला. यावेळी जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि लाठीचार्ज केला.