sudhir mungantiwar at art exhibition
मुंबई:‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या (Bombay Art Society) 131 व्या ‘अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाला (Art Exhibition) 07 फेब्रुवारी 2023 रोजी सुरुवात झाली असून. प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), डॉ. सरयू दोशी, कला इतिहासकार व राष्ट्रीय आधुनिक कलादालनाच्या माजी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “देव हा परम कलाकार असतो आणि जेव्हा आपण कलाकारांनी तयार केलेली कला पाहतो तेव्हा ती आपल्याला देवाच्या जवळ आणते. महाराष्ट्र हा संस्कृतीचा खजिना असून तो 10 व्या क्रमांकावर येतो. जहांगीर आर्ट गॅलरी सोबत आणि पूल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी हे कलाकारांसाठी नाममात्र दरात त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी खुले करू. खास महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक पोर्टल तयार करणार आहोत जे त्यांच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवू शकतात व तसेच यात जगभरातील लोक प्रवेश करू शकतात”.
बॉम्बे आर्टसोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणतात “131 व्या वार्षिक कला प्रदर्शनाला देशभरातून 2500 प्रवेशिका मिळाल्याने मी आनंदी आहे. विविध कला प्रकारातील 48 अंतिम स्पर्धकांची निवड करून ज्युरींनी प्रशंसनीय काम केले. बॉम्बे आर्ट सोसायटी दिग्गज कलाकारांना पुरस्कार देत असते. महाराष्ट्र निसर्ग कला शैली सुरू करणाऱ्या प्रा.जी.एस. माजगावकर यांचा यंदा आम्ही गौरव करत आहोत”.
या वर्षी सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आसाम, अशा देशभरातील बऱ्याच राज्यातून एकूण 2500 प्रवेशिका मिळाल्या असून हे प्रदर्शन खरोखर आपल्या देशातील कलेचे, प्रचलित कलाप्रवाहांचे प्रतिबिंब आहे, अशी माहिती बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.
या प्रसंगी, नामवंत चित्रकार प्रा. जी. एस माजगावंकर यांना या वर्षाच्या ‘रूपधर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चित्रकार किशोर इंगळे यांना ‘गव्हर्नर अवार्ड’ तर शिल्पकार सिद्धेश ठाकूर यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे गोल्ड मेडल या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देण्यात आले. या वर्षी चित्रकार मोनिका घुळे यांना ‘बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती’, ‘शिल्पकार स्वप्नील गोडसे यांना संगीता जिंदाल शिष्यवृत्ती’ तर आंध्र प्रदेशचे कंदुला प्रदीप कुमार व उस्मानाबादचे मदन पवार यांना ‘संध्या मिश्रा शिष्यवृत्ती’ विभागून देण्यात आली. इतर 48 पारितोषिके देखील प्रदर्शनात प्रदान करण्यात आली.
या प्रदर्शनात देशभरातून चित्रकृती, शिल्पकृती, छायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील 2500 प्रवेशिका आल्या आहेत. दृषकला क्षेत्रातील तज्ञ, कलासमीक्षक, कला इतिहासकार अशा मान्यवरांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे सदर कलाकृतींमधून 189 कलाकृती या वर्षी निवडल्या असून त्या सदर प्रदर्शनात पाहता येतील. 189कलाकृतींमधून, जवळपास सहा लाखापेक्षा जास्त रकमेची एकूण 48 विविध पारितोषिके, शिष्यवृत्ती आणि कलाक्षेत्रातील महत्वाचे समजले जाणारे पुरस्कार 7 फेब्रुवारीला जहांगीर कलादालनात प्रदान करण्यात आले.
7 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान कलारसिकांना हे प्रदर्शन पाहता येईल. त्यानंतर 16 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रदर्शनातील निवडक कलाकृती ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वांद्रे येथील कलासंकुलात देखील प्रदर्शित केल्या जातील.