मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आलेले आहे. मात्र महायुतीकडे अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. यावरुन महाविकास आघाडीचे अनेक नेते टीकास्त्र डागत असतात. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माढा व नाशिक मतदारसंघावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. सुनील तटकरे म्हणाले, “माढा संदर्भात आज बैठक पार पडली. रामराजे निंबाळकर, फलटणचे आमदार त्याचबरोबर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत उपयुक्त अशी चर्चा झाली. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणे कसे उभे राहता येईल, यावर देखील चर्चा पार पडली. त्याचबरोबर देवेंद्रजींसोबत सुद्धा चर्चा झाली. आम्ही त्या लोकसभा मतदारसंघातला सुद्धा आढावा घेतला, निवडणूक प्रचाराचा कॅम्पेन यावर सुद्धा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. तिसरा टप्प्यात ज्या लोकसभा निवडणूक आहेत लोकसभा मतदारसंघांचा आढावा आणि सगळं कॅम्पेन यावर सुद्धा बैठक झाली. आमचा विश्वास आहे, सगळं काही तिकडे सुरळीत होईल” असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा देखील महायुतीमध्ये अद्याप तसाच आहे. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेमध्ये असले तरी असून महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील पुन्हा तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या लोकसभा जागेचा निर्णय झालेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले, “आज अंतर्गत चर्चा जरूर झाली आहे. पूर्वी सुद्धा अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, त्यामुळे एक दोन दिवसात बसून या जागेवर निर्णय होईल. तसेच महायुतीतील त्या त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील” अशी प्रतिक्रिया नाशिक लोकसभेच्या जागेचा उमेदवाराबाबत सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.