राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. असे असताना देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. सामान्यतः होळीनंतर उष्णता वाढण्यास सुरुवात होते, परंतु, यंदा हवामानातील बदलामुळे होळीआधीच कमालाची उकाडा जाणवत आहे.
सध्या महाराष्ट्रासह गुजरात राजधानी दिल्लीतील इतर शहरांमध्ये सूर्य आग ओकत आहे. गुजरातसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कमालीचा उकाडा जाणवत आहे. असे असले तरी शनिवारपासून तापमानात घसरण येईल, असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे. दिल्लीत शुक्रवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे की सामान्यपेक्षा 5.5 अंश सेल्सिअसने जास्त होते. तर किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार
15 आणि 16 मार्च या दोन दिवस ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्कायमेटच्या मते, 15 मार्चपासून उष्णतेची लाट कमी होईल. कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास राहू शकते.
अनेक राज्यात उष्णतेचा तडाखा
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. गुजरात-राजस्थानमधील डझनभराहून अधिक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा ८.८ अंश सेल्सिअसने जास्त आहे. चंद्रपूरात 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा गेल्याचे दिसून आले.
विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानात वाढ
साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यात पडणारा उष्मा यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत अकोल्यातील कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, मात्र, मार्चच्या सुरुवातीपासून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यातील तापमान 39 ते 41 अंशांच्या दरम्यान दिसून आले. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारानंतर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होताना दिसत आहे.