उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी
सोलापूर : सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. उजनी येथील पंप हाऊस, उजनी दुहेरी पाईपलाईन, पंपिंग मशीनरी, जॅकवेलची, बीपीटी इत्यादीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंगाराव यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत आलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच 110 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे शहराला 170 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून, या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व 6 पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून, आज 1150 अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणीसाठी सुरु करण्यात आले. या एका पंपाद्वारे सोलापूरपर्यत किती वेळेत, किती MLD पाणी पोहोचणार आहे, याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरु करण्यात येणार आहे. अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल. नदी वाटे जे पाणी वाया जात होते, त्यात बचत होऊन ते पाणी शेत करण्याऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहचले.