NEET परिक्षेतील गोंधळावरुन आदित्य ठाकरे आक्रमक
मुंबई : देशामध्ये सध्या नेट परिक्षा रद्द व पेपरफुटी प्रकरण तापले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान झाले असून विद्यार्थी रोष व्यक्त करत आहेत. एनटीएमार्फत घेतली जाणारी युजीसी नेट परीक्षा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता परीक्षेला अवघे 12 तास शिल्लक असताना नीट (NEET) पीजी परीक्षाही रद्द केली आहे. यामुळे शैक्षणिक व अर्थिक मोठे नुकसान होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपला घेरले असून जाब विचारला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व खासदार प्रियंका चतुर्देवी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एक परिक्षा सरकारला ‘नीट’ घेता येत नाही अशी जहरी टीका करण्यात आली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत नीट परिक्षेतील सावळ्या गोंधळावरुन केंद्र सरकारला लक्ष केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, काल CET च्या परीक्षांसंदर्भात उत्तर द्यायला डायरेक्टर होते, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड होणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी अद्याप उत्तरपत्रिका हातात का नाही देत, असेही म्हटले. तसेच, नीट परीक्षांबाबत जो कोणी चूक आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण होईल असं मला वाटत नाही, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील नीट परिक्षेच्या मुद्द्यावरुव सरकारवर टीका केली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “मी म्हणेन की या देशात शैक्षणिक आणीबाणी लागू आहे, ज्याप्रमाणे परीक्षा रद्द केल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक परीक्षा रद्द होत आहेत, पेपर पुढे ढकलले जात आहेत. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेत नाहीत. देशातील NEET परीक्षांच्या चौकशीला त्यांनी नकार दिला आहे. केवळ एनटीए अध्यक्षांची बदली करुन काम झालं का, संपूर्ण शिक्षण विभाग यास जबाबदार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा’ अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.