
शास्त्रीनगर क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या प्रस्तावाचा घोटाळा उघडकीस, एकनाथ शिंदेंकडे रहिवासी न्याय मागणार
ठाण्यातील शास्त्रीनगरमधील रहिवाशांना विश्वासात न घेता, अंधारात ठेवून आणि स्वहितासाठी काही व्यक्तींनी ठाणे महापालिकेकडे क्लस्टर पुनर्विकासाचा प्रस्ताव 30 एप्रिल 2025 रोजी एकतर्फी दाखल केला. याविरोधात रहिवाशांनी एकजूट दाखवत ठाणे महापालिकेकडे हरकत दाखल केली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाविरोधात स्थानिक माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नागरिकांनी न्यायालयाचा मार्ग पत्करण्याचाही निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगर-शास्त्रीनगर फेडरेशनची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शेकडो रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांनी स्पष्ट केले की, 2017 पासून हणमंत जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर 75% रहिवाशांनी विश्वास दाखवला असून, त्यांनाच आमचा विकास करायचा असल्याचे स्पष्ट केले.
शास्त्रीनगर विभागातील काही लोकांनी याआधी SRA योजनेच्या माध्यमातून विकास घडवून आणण्याचा घाट घातला होता. परंतु या योजनेमध्ये मालकी हक्काची घरे मिळण्याची हमी नसल्यामुळे स्थानिकांनी ती नाकारली होती. त्याऐवजी मॉडेल कॉलनी आणि सुरभी या दोन नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी लोकमान्यनगर-शास्त्रीनगर गृहनिर्माण फेडरेशन स्थापन करण्यात आले.
रहिवाशांच्या सांगण्यानुसार, जेव्हा सुसंवाद सुरू असताना अचानक ओम श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनीने महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केला, तेव्हा त्यांनी कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने 17 जुलै रोजी आयुक्तांना हरकत पत्र दिले. त्या पत्रात महापालिकेची दिशाभूल झाल्याचा आरोप करत, प्रस्ताव रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनाही पत्राद्वारे कळवले गेले असून, त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांना पूर्ण विश्वास असल्याचे फेडरेशनने नमूद केले आहे.
Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
रहिवाशांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आम्ही कोणत्याही हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही कारभारास मान्यता देणार नाही. आमचा विकास हा केवळ क्लस्टर योजनेच्या माध्यमातून, नागरिकांच्या सहमतीनेच होईल. एकनाथ शिंदे हे नेहमीच जनतेचा आवाज ऐकतात व नागरिकांना मालकी हक्काची घरे मिळवून देतात, त्यामुळेच त्यांच्याकडे न्यायासाठी आम्ही जात आहोत, असे हणमंत जगदाळे व स्थानिकांनी ठामपणे सांगितले.